संवाद लेखन - तो आणि ती
प्रसंग : ' तो ' सततच्या आर्थिक चणचण आणि वैयक्तिक अडचणी यामुळे आपल्या जीवनाला कंटाळून हे आयुष्य संपवायला निघालेला असतो.
स्थळ : रेल्वे स्टेशन.
वेळ : संध्याकाळी सहा वाजता.
( समोरून भरधाव वेगात रेल्वे येणार अशी सूचना मिळते. तो उडी मारणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजतो. अत्यंत रागीट मुद्रेने तो मोबाईल कडे पाहतो. ती गाडी निघून जाते. मग पुढील गाडी येईपर्यंत कोण आहे म्हणून तो फोन उचलतो. )
तो : हॅलो ??
ती : अरे कुठे आहेस तू ? मला असे समजले की तू हे जीवन संपवायला निघालेला आहेस ??
तो : होय. खर आहे हे. मी आजच हे जीवन संपवत आहे. त्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो पक्का झालेला आहे.
ती : वेडा झालास का रे ?? इतके सुंदर आयुष्य देवाने आपल्याला दिलेले आहे आणि ते तू असेच व्यर्थ घालवणार आहेस का ? या जगात कोणाला दुःखे नाहीत रे; पण म्हणून काय प्रत्येकाने हाच एक मार्ग पत्करणे हे योग्य आहे का ?
तो : मग मी काय करू ?? कोणासाठी जगायचं मी ? कोण आहे माझं या जगात ?
ती : कोणासाठी जगल पाहिजे असे कोणी सांगितले ? स्वतःसाठी सुध्दा मनुष्य जगत असतो. मला नक्की सांगशील का की काय घडले आहे असे की तू हे पाऊल उचलले ?
तो : ऐकणार आहेस ??
ती : तुझे दुःख काही प्रमाणात तरी हलके होईल मला सांगितल्याने. सांग मला काय झाले आहे ?
तो : ऐक मग. कालपर्यंत सगळ काही सुरळीत सुरू होत आयुष्यात. पण अचानक ऑफिस मध्ये क्षुल्लक कारणावरून एका सह कर्मचाऱ्याशी माझा वाद झाला आणि त्याने वरिष्ठांकडे तक्रार करून मला कामावरून कमी करण्यास भाग पाडले. काहीही कामाचा उरलेला मोबदला न देता मला धक्के मारून ऑफिसच्या बाहेर काढले. इतका अपमान माझा आत्तापर्यंत कोणीही केला नव्हता. घरी गेलो तर घर मालक दारातच बसून होता. तो म्हणाला की आधी भाड्याची थकबाकी जमा कर आणि मग घरात पाऊल ठेव नाहीतर आहे तेदेखील सामान बाहेर काढून कुलूप लावतो मी खोलीला. त्याची कशीबशी मनधरणी करून एक दिवसाची मुदत मागून घेतली.
ती : मग ?? पुढे काय झालं ??
तो : ( रडत असतो. )
ती : ऐक माझं, रडून काहीच उपयोग नाही. तू जे काही तुझ्या मनात ठेवत आहेस ते मला सांग. म्हणजे तुझे मन हलके होईल आणि यावर नक्कीच काही मार्ग काढू शकतो आपण.
तो : मग सकाळी उठून काही खास मित्र होते त्यांच्याकडे थोडी मदत कराल का म्हणून विचारणा केली. पण म्हणतात ना ' असतील शिते तर जमतील भूते ' त्याप्रमाणे त्यांनी देखील पाठ फिरवली. नातेवाईक देखील संपर्क ठेवायला तयार नव्हते. मग कोणत्या तोंडाने मी घरी जाणार होतो ?? सर्व दिशेने अंधारच नजरेस पडत होता माझ्या. त्यामुळे मी शेवटी हा मार्ग पत्करला आणि आज हे आयुष्य संपवणार होतो.
ती : अरे संकटे ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतात. पण म्हणून काय त्याने नेहमी हार मानावी का ? तुला या परिस्थिती मधून बाहेर काढण्यास सगळ्यात मोठा आधार म्हणजे आपल्या कुलदेवतेला शरण जाणे. आपल्या कुलदैवताचे स्मरण आणि नामस्मरण कर आणि पुन्हा नेटाने प्रयत्नाला लाग. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. केव्हाही असे एकटे वाटले तर चांगली गाणी ऐकत जा. सकारात्मक विचार कसे जास्त येतील असे काही ऐक. मित्रांची संगत केव्हाही चांगली पण ते मित्र कसे आहेत हे ओळखायला शिक. कामापुरते मित्र काहीच कामाचे नसतात. तुला याचा अनुभव आलाच आहे.
तो : पण तुला खरंच वाटतं का की याने फरक पडेल ?
ती : का नाही, नक्कीच फरक पडेल. नव्या उमेदीने आयुष्य जगायला शिकले पाहिजे. आत्मपरीक्षण कर. त्यातून तुझ्या चुका तुला कळतील आणि त्यावर भविष्यात त्या चुका आपल्या हातून पुन्हा घडणार नाहीत याकडे लक्ष दे. नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न कर. नक्कीच मार्ग निघेल. घरमालकाला खात्री पटवून दे की त्याचे पैसे बुडणार नाहीत. सर्व काही ठीक होईल.
तो : खूप खूप आभार तुझे.
ती : अरे, आभार कसले मानतो ? तुझे मन या अविचारापासून वळवले यातच सर्व काही आले. तुला केव्हाही काही वाटले तर मनमोकळे पणे माझ्याशी बोलत जा. आता शांत मनाने आपल्या घरी जा. तुझे पुढे सर्व काही चांगले होणार आहे.
तो : हो येतो मी. आणि पुन्हा एकदा वचन देतो तुला की यापुढे असले कोणतेही पाऊल मी उचलणार नाही.
ती : मलाही आनंद होईल. चल, बोलू मग ! शुभ रात्री.
तो : शुभ रात्री.
( अशा प्रकारे वेळीच संवाद झाल्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले आणि आज तो एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतो आणि भाड्याची खोली सोडून एक नवीन जागा विकत घेऊन त्या ठिकाणी एक छानसे घर बांधून त्यात राहतो. तात्पर्य म्हणजे कोणतेही अविचाराने उचललेले पाऊल आपल्याला आयुष्यात अंधारच देऊन जाते. पण अशा वेळी एक संवाद आशेचा किरण घेऊन येतो. )
Comments
Post a Comment