गो ग्रास :- एक कालवश होणारी संकल्पना

गोग्रास - एक कालवश होणारी संकल्पना
चेतन जोग (पुणे)
http://www.instagram.com/chetan_jog1992

गोग्रास !!
बऱ्याच दिवसांपासून या विषयावर काहीतरी लेखन करावे असे माझ्या मनात होते. योगायोगाने विषय मिळाला त्यामुळे मी आज हा लेखनप्रपंच आपल्यापुढे मांडत आहे. सदर लेख हा चार मुख्य भागात विभागला आहे.

१) गोग्रास ही संकल्पना

२) याबाबत थोडी विस्तृत माहिती

३) एक छोटी आठवण

४) या विषयाचा दुसरा पैलू आणि तात्पर्य



चला तर सुरुवात करूया.

१) गो ग्रास ही संकल्पना :-

गो ग्रास या नावातच या संकल्पनेचा अर्थ दडला आहे. गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे घास. गायीला घास देणे म्हणजे गो- ग्रास. यात अनेक पद्धती आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात ही प्रथा पूर्वापार पासून चालत आली आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोकण भागात आजही दुपारच्या भोजना अगोदर गायीला गोग्रास घालतात. यात मुख्य म्हणजे इतरांसाठी जे जेवण केले जाते त्याचाच लहान भाग व सोबत गायीसाठीचे थोडे खाणे असा समावेश असतो. एकदा गायीने हे खाल्ले की मग घरातील इतर सदस्य भोजनासाठी सुरुवात करतात.

२) याबाबत थोडी विस्तृत माहिती :-

भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये गाय ही कायम पूजनीय मानली जाते. अनेक धार्मिक कार्यामध्ये देवांसोबत गाईचाही नैवेद्य काढला जातो आणि जेवणाअगोदर गायीला खायला घातला जातो. यामागे एक संदेश असाही दिला जातो की यामुळे संपूर्ण कुटुंब आणि समाज आनंदी राहण्यास मदत होते. याला पौराणिक आधार देखील आहे. समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यात कामधेनू चा समावेश होता. याचबरोबर असेही मानले जाते की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गायीला खायला घालणे हे परिणामी तेहतीस कोटी देवांची पूजा करण्यासारखे आहे. याला व्यवहारिक दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. आयुर्वेद सारख्या पुरातन वैद्यक ग्रंथांमध्ये सांगितल्या प्रमाणे गायीचे मल, मुत्र, दूध, तूप, आणि दही हे निरोगी राहण्यासाठी महत्वाचे आहे. याचाच वापर अनेक धार्मिक विधींचे सुरुवातीस होतो. गायीच्या मल आणि मुत्रांचा सर्वात जास्त फायदा खत निर्मितीसाठी होतो ; जेणेकरून झाडांची वाढ जोमाने व्हावी. याप्रमाणे पाहिले तर पवित्रता हा गायीचा मुख्य गुणधर्म आहे. गो - ग्रास देखील आपल्याला कर्म, स्वभाव, चारित्र्य आणि शुध्द वर्तणुकीचा संदेश देतो. कारण यामुळेच जो हे पुण्य काम करतो त्याचे कुटुंब आणि समाज यामध्ये त्याची मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते. गाय ही मुळातच शांत आणि नम्र स्वभावाची असते. तिचा हा स्वभाव हेच शिकवतो की हिंसा न करता विनम्र रहा. अशा प्रकारे गो ग्रास ही संकल्पना आपल्याला खूप चांगले आणि महत्वाचे संदेश देऊन जाते.

३) एक छोटी आठवण :-

वर उल्लेख केल्याप्रमाणे ही प्रथा विशेषतः कोकणात पाहायला मिळते. माझे गाव देखील रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नांदिवडे. ही आठवण खूप जुनी आहे. पण आजही आठवली तरी खूप मनाला आनंद देऊन जाते. उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आम्ही गावाला आलो होतो. लहान असल्यापासूनच पुस्तकात वाचल्याने म्हणा किंवा आई बाबांनी वर्णन केल्यामुळे म्हणा पण कोकणाविषयी एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली. तेथील मनाला शांतता देणारे वातावरण, पहाटेच्या वेळी विविध पक्षांच्या किलबिलाटाने येणारी जाग, मनसोक्त फिरायला मिळणे आणि गुरांचे हंबरणे तसेच मुख्य आकर्षण म्हणजे मनसोक्त आंबे फस्त करणे. यामुळे कधी एकदा उन्हाळी सुट्ट्या लागतात याकडे लक्ष लागलेले असायचे. तर सकाळची कामे संपवून फ्रेश होऊन मी ओटीवर ( आजच्या भाषेत मुख्य खोलीत ) बसलो होतो. इतक्यात " मनु, इकडे ये, गायीला गो ग्रास घालून ये जा ! " अशी आजीची हाक ऐकू आली. हा जो क्षण होता याची आम्ही नातवंडे खूप आतुरतेने वाट पाहत असायचो. कारण या निमित्ताने आम्हाला गोठ्यातील गायी आणि वासरांसोबत काही वेळ घालवता यायचा. गो ग्रास खात असताना गायीच्या पाठीवरून आणि तोंडावरून प्रेमाने हात फिरवणे म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. मग आम्ही सगळे गो ग्रास घालून पाणी पाजून परत येऊन जेवायला बसलो. अशी सुंदर आठवण आजही आठवली की मन प्रसन्न होऊन जाते.

४) याचा दुसरा पैलू :-

गो ग्रास ही संकल्पना जरी योग्य आणि आवश्यक वाटली तरी काळाच्या ओघात मागेच पडत आहे. जसजशी शेतीची साधने उपलब्ध होत गेली तसतसा पाळीव गुरांचा वापर कमी झाला. ट्रॅक्टर, ट्रेलर आले तसेच पाणी खेचण्यासाठी विजेवर चालणारी यंत्रे आली. त्यामुळे पूर्वी प्रत्येक कामासाठी बैल किंवा रेड्याचा वापर होत होता तो बंद झाला. काळाच्या ओघात जशा चांगल्या सुविधा मिळू लागल्या तशी गैरसोय देखील होऊ लागली. जनावरे सांभाळण्यासाठी लागणारे त्यांचे खाद्य, गवत ई. भाव खूप वाढले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हे परवडेनासे झाले. परिणामी त्यांनी एकतर गुरे पाळणे बंद केले किंवा ज्यांच्याकडे होते त्यांनी ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवणाऱ्या तबेल्याना विकून टाकले. आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने प्रत्येक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. यात संकरीकरण हा देखील खूप मोठा शोध आहे. ज्या गायी म्हशिंपासून दिवसाला अंदाजे ५ लिटर दूध मिळत असे त्याच संकरित गायिम्हशिंपासून दुप्पट प्रमाणात मिळते. यांचा सांभाळ करण्यासाठी मुख्यत्वे तबेल्यांशी संपर्क केला जातो. आर्थिक बाबतीत तबेल्याना मिळणारा मोबदला पाहता त्यात गुरांची देखभाल आणि खाणे यांचा खर्च सहज जमून येतो.

ही संकल्पना लोप पावण्यात अजून एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे संस्कारांची कमतरता. काही प्रमाणात विभक्त कुटुंब पद्धती ही देखील यासाठी जबाबदार ठरते. ही संकल्पना आपल्या पुढील पिढीपर्यंत पोचवण्यात पालक कमी ठरत आहेत. या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जागेची कमतरता. गुरे सांभाळण्यासाठी जी जागा लागते ती गाव सोडले तर शहरी भागात तेवढी जागा नाही जितकी तबेलेवाल्यांकडे असते. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर बहुतांश लोक नोकरी निमित्ताने शहरात आलेले असतात त्यामुळे शहरात नोकरी, संसार यामधून त्यांना वेळ मिळत नाही. गतिमान जगात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला धावपळ करावीच लागते. म्हणूनच अशा ठिकाणी गो ग्रास ही संकल्पना अस्तित्वात आणणे शक्य होत नाही. कारण सगळेच तबेलेवाले त्यांच्यासाठी अन्न स्वीकारत नाहीत.

जसजसे लोकांमध्ये नकारात्मकता वाढताना दिसू लागली तसे बऱ्याच जणांना गो ग्रास हा एक चांगला पर्याय दिसू लागला. त्यामुळे आपल्यावर आलेली संकटे घालवण्यासाठी काही चांगले कार्य करावे या हेतूने ही संकल्पना नव्याने सुरू करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. आजही शहरी भागात विशेषतः मंदिराच्या शेजारी किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाय सोबत घेऊन बसणारे लोकांना याचे महत्व कळावे यासाठी चारा आणि गुरांच्या खाण्याचा लाडू हे विकत देताना दिसतात. हा चारा आणि खाणे विकत देण्यामागे पण एक कारण आहे. ही लोकं गरीब वस्तीतून आलेली असतात ज्यांची दोन वेळ जेवणाची देखील भ्रांत असते. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी गाय महत्वाची भूमिका निभावते.

तात्पर्य म्हणजे सर्व मानवजातीचे कल्याण करणारी, त्यांच्यात सकारात्मकता, विनम्रता आणि भरघोस यश मिळवून देण्यात पुण्याचा भाग बनणारी गो ग्रास ही संकल्पना पुन्हा एकदा नव्याने वाढीस लागावी यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

किल्ले कोहोज- एक थरारक आणि रमणीय अनुभव

संवाद लेखन - तो आणि ती