किल्ले कोहोज- एक थरारक आणि रमणीय अनुभव


पावसाळा सुरु झाला कि साहजिकच त्या पावसाचा आनंद घेत भटकंती करायची म्हणून अनेक पर्यटक ट्रेकर्स यांची पावले गड,किल्ले यांच्याकडे वळतात. किल्ले कोहोज हा तसा अपरिचित पण पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मनोरी या डॉन गावलगतचा विस्तीर्ण असा किल्ला अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. या किल्ल्याला इतिहास तसा फारसा नाहीच पण तरीही या किल्ल्या बाबत सांगायचे म्हणजे :-
      गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

तर अशा या कोहोज किल्ल्याला भेट देण्याचा मानस ठरला.आयोजक होते - आमची वसई सामाजिक संस्था आणि ट्रेकिंग ग्रुप. दिवस ठरला २४ जुन २०१८ सकाळी ७ वाजता.

जसे या ट्रेक साठी नोंदणीचे दिवस कमी राहिले तसे तब्बल १३० जणांनी पटापट पैसे जमा करून आपली नावे निश्चित केली. अखेर रविवारचा दिवस उजाडला. या ट्रेक साठी वसई आणि विरार दोन्ही ठिकाणाहून खाजगी बस ची सोय केली होती.मी सकाळी ७ वाजता वसई डेपोत पोचलो. माझ्याही आधी काही ट्रेकर्स तिथे येऊन उभे होते. त्यांच्याशी ओळख करून घेऊन उभ्या असलेल्या बसमध्ये बसलो. वाटेत अजून काही ट्रेकर्स आम्हाला येऊन मिळाले. त्यांना घेऊन १० वाजता 'अविचरपाडा' या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात येऊन पोचलो. आता पाऊस सुरु झाला होता. पावसाळी ट्रेक असल्यामुळे त्या पावसाचा आनंद घेत आम्ही गरमागरम पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्वाना सूचना देऊन ११ वाजता आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.

पावसाळा सुरु होऊन एक आठवडा झाला होता आणि ट्रेक च्या  दोन दिवस अगोदर आम्ही निसर्गाचे रौद्र रूप बघितले होते. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. तरीही गड चढायचाच हि इच्छाशक्ती जबर होती आणि त्यावर आम्ही चालत होतो. आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ आणि निरनिराळ्या रंगीबेरंगी पानाफुलातून चालताना मन अगदी सुखावून गेलं होत.!हे सर्व क्षण कॅमेरात टिपत,सेल्फी काढत आमचा प्रवास सुरु होता. वातावरणात थंडावा असल्यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता. तरीही काही ठिकाणी तीव्र चढ असल्यामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी वाटेत थांबलो. पावसाचा आनंद घेत फलाहार केला. तहान जरी लागत नसली तरी शरीराला पाण्याची गरज भासतेच. म्हणून जवळील पाणी थोडे थोडे पिऊन विश्रांती घेतली. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. काही वेळ वाट बघून आम्ही पुढे प्रवास चालू केला. आता आम्ही गडाचा तीन चतुर्थांश भाग चढलो होतो. एक चतुर्थांश भाग बाकी असताना पावसाचा जोर आणि ढगांचे सावट यामुळे आमची गती मंदावली होती तरीही वाटचाल सुरूच होती.

गडाचा तीन चतुर्थांश भाग चढून आल्यावर आपण एका विस्तीर्ण पठारवजा मोकळ्या जागेत येऊन पोचतो. या ठिकाणी एक तलाव आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आम्ही सुरक्षित ठिकाणी उभे राहून तो क्षण कॅमेरात टिपून घेतला. सेल्फी काढून ती आठवण अजून स्मरणीय केली. इथपर्यंत येताना वाटेत अनेक लहान मोठे ओढे,झरे,धबधबे आहेत. सुरक्षितपणे वावरल्यास आपण त्याचा देखील आनंद घेऊ शकतो. थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. वाटेत दिसणारे खेकडे,पक्षी यांचा आवाज यामुळे वेळेचा अंदाज येत नव्हता. काही वेळ असेच चालल्यावर आम्ही एका मंदिराजवळ येऊन पोचलो. या ठिकाणी एक तात्पुरता मांडव आहे ज्या ठिकाणी आपण जेवणासाठी विसावा घेऊ शकतो. समोरच तीन दगडी पाण्याची टाकी आहेत. पावसामुळे त्यात जमा झालेल्या पाण्यात तेथील स्थानिक आणि काही ट्रेकर्स मजा घेत होते.

थोडा वेळ या ठिकाणी थांबून आम्ही गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी कूच सुरु केली. आजूबाजूला वाहत असलेल्या छोट्या छोट्या ओढ्यांचा आनंद घेत आमची वाटचाल सुरु होती. अंदाजे पाऊण तासात आम्ही गडाच्या माथ्याजवळील भग्न अशा तटबंदीजवळ येऊन पोचलो. इथून परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतो. तटबंदीच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर एक सुळका सर्वांचे लक्ष वेधून घेतो. या सुळक्यावर सुरक्षित बसता येईल इतपत जागा आहे त्यामुळे काही ट्रेकर्स मंडळींनी तिथे बसून झेंडा फडकवत फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. या सुळक्याकडे जाण्याची वाट मात्र फारच अरुंद आणि निसरडी आहे त्यात पाऊस सुरु असल्यामुळे आम्ही अजिबात घाई न करता सावधानता बाळगून फोटो काढण्याचा आनंद घेतला. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे त्यावर फडफडणारा झेंडा पाहतांना मन प्रफुल्लित झाले होते. थोडा वेळ निसर्गाचा आनंद घेतल्यावर आम्ही पुढे निघालो. दुसऱ्या टोकालाही असाच सुळका होता तिथेही जाऊन फोटो काढले.

एव्हाना पावसाचा जोर कमी झाला तरी रिपरिप चालूच होती.कोहोज का किल्ला ज्या दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्या म्हणजे १. वाऱ्याच्या प्रवाहाने तयार झालेला दगडी मानवाचा पुतळा,२.अतिशय सुंदर,मनमोहक असे राधाकृष्णाचे मंदिर.या गोष्टी पाहायला आम्ही उत्सुक होतो. सर्वप्रथम आम्ही दगडी मानव बघायचा हे निश्चित करून त्या दिशेने वाटचाल सुरु केली. मित्रहो, या पुतल्याकडे जाणारी वाट हि पावसाळ्यात अतिशय निसरडी,चिखलमय आणि अरुंद आहे.त्यामुळे आम्ही सावधानतेने त्या ठिकाणी पोचलो. अतिशय सुंदर व मनाला आनंद देणारे दृश्य होते हे..! हा दगडी मानव हात पसरून जणू पावसाला आणि ट्रेकर्स मंडळींना निमंत्रण देत होता. त्यामुळे मधेच पावसाचा जोरही वाढत होता. काही वेळ तिथे सेल्फि काढून निसर्गाच्या या चमत्काराचा आनंद घेतला आणि पुढे निघालो. राधा कृष्ण मंदिराकडे जातानाचा मार्गही असाच अरुंद,आणि निसरडा होता तरीही काळजीपूर्वक हादेखील टप्पा आम्ही पार केला. या ठिकाणी जाताना आधी काही अंतर उतरून पुन्हा चढावे लागते. मंदिरात गेल्यावर ती मूर्ती पाहताक्षणी आम्ही भारावून गेलो. अतिशय सात्विक भाव त्या मूर्तीवर दिसतात. दर्शन घेऊन काही क्षण तिथेच विसावलो,आठवणी कॅमेरात कैद करून परतीच्या मार्गाला लागलो.

चढताना ते ठिकाण बघायच्या ओढीने चढलेले आम्ही ट्रेकर्स ती बिकट वाट उतरताना थोडेसे मनातून घाबरलो. पण एवढ्याशा गोष्टीने घाबरून जाईल तर तो ट्रेकर कसला ! त्यामुळे मार्गदर्शक,अनुभवी ट्रेकर्स च्या सल्ल्याने आम्ही सुखरूप खाली उतरलो. तटबंदीच्या पायऱ्या उतरून काही क्षण विसावलो आणि काळजीपूर्वक पावले टाकीत परतीची वाट धरली. आजूबाजूला लक्ष देत आम्ही त्या मंदिराजवळ येऊन पोचलो. एव्हाना चढ-उतार यामुळे प्रत्येक ट्रेकर्सच्या पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते त्यामुळे त्या मांडवात येताच सर्वांनी जेवणावर ताव मारला. काही क्षण तिथे विश्रांती घेऊन एक ग्रुप सेल्फी काढून गड उतरायला सज्ज झालो. आमची आठ जणांची तुकडी प्रथम गड उतरायला निघाली. अंदाजे पाऊण तासाच्या उतरणी नंतर एका वळणावर पावसाचा जोर वाढल्यामुळे आम्ही थांबलो आणि पुढे निघालो पण नंतर लक्षात आले कि ते वळण चुकीचे होते.आम्ही वाट चुकलो होतो.आठ जणांच्या तुकडीपैकी आम्ही सहा जण वेगळे आलो होतो.मनातून प्रचंड भीती वाटायला लागली कारण निसर्गाने देखील या वेळपर्यंत रौद्र रूप दाखवायला सुरवात केली होती.पावसाचा जोर वाढला होता.काळ्या ढगांचे सावट आमच्यावर आले होते.आम्ही एका जागी न थांबता वाट शोधत राहिलो.या प्रयत्नात आम्ही काही शेते गुडघाभर चिखलातून तुडवली.. शेवटी एका गावकऱ्याला आम्ही भटकताना दिसलो.त्यांच्या मदतीने आम्ही मुख्य रस्त्याला लागण्यासाठी चालू लागलो. पण किती वेळ चालत होतो याचा अंदाजच लागला नाही. गावकऱ्याच्या मदतीने आम्ही मुख्य रस्त्याला लागलो त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि आमच्या नियोजित ठिकाणाकडे वाटचाल सुरु केली.मुख्य रस्त्यापासून ते आमचे नियोजित ठिकाण हे अंतर गाठण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागला. आम्ही ज्या रस्त्याने आलो त्या भागाचे नाव होते 'नाणे'. अखेर आम्ही आमच्या नियोजित ठिकाणी पोचलो.आमच्या आधी बरीच मंडळी येऊन विश्रांती घेत होती.आम्हाला पाहताच त्यांच्या जिवात जीव आला आणि आम्ही त्यांना हा अनुभव सांगितल्यावर त्यांचे डोळे विस्फारले गेले.त्यांनी आमचे कौतुक देखील केले कि अशा प्रसंगीदेखील प्रसंगावधानता दाखवत मार्ग शोधून काढलात.हातपाय गाळून बसून काहीच होत नाही हीच एक ट्रेकर्सची परीक्षा असते.मग काही वेळ विश्रांती घेऊन गरमागरम वडापाव आणि चहा चा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बरेच जण निद्रादेवीच्या अधीन झाले तर काही जण ट्रेक कसा झाला याबाबत अभिप्राय देऊ लागले. मजल दरमजल करीत आमची बस वसई स्टेशनला रात्री १०:३० वाजता पोचली.तिथून पर्यायी मार्गाने सर्वजण आपापल्या घरी गेले.

अशा प्रकारे थोडी मजा,मस्ती,थोडा थरारक अनुभव आणि खूप साऱ्या आठवणी सोबत घेऊन आमचा हा ट्रेक पूर्ण झाला.


Comments

Popular posts from this blog

गो ग्रास :- एक कालवश होणारी संकल्पना

संवाद लेखन - तो आणि ती